जळगाव : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. यावेळच्या निवडणुकीत जळगाव शहर, पाचोरा, पारोळा – एरंडोल, मुक्ताईनगर, रावेर या मतदारसंघात नव्या पिढीतील नव्या दमाचे उमेदवार प्रस्थापित, अनुभवींना टक्कर देण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. तर जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, जळगाव ग्रामीण, चोपडा, भुसावळ येथे कधी काळचे सहकारी, मित्र यांच्यात लढती होणार आहेत. सत्तेची परिक्रमा करताना राजकीय क्षितीजावर अनेक समिकरणं बदलली आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राजकारणाचा वसा आणि वारशातून उमेदवारी मिळाल्यानंतर जयश्री महाजन, वैशाली सुर्यवंशी, रोहिणी खडसे या तिघे महिला आणि अमोल जावळे, धनंजय चौधरी, अमोल पाटील हे युवा उमेदवार इतिहास घडवतील का? याची उत्सुकता आहे. तिघांपैकी दोन युवा उमेदवार हे रावेर ह्या एकाच मतदारसंघात आमने – सामने आहेत.
पुन्हा मामा की माजी महापौर
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ हा कोणेकाळी पक्षाचा नाही तर सुरेशदादा जैन यांचा बालेकिल्ला होता. त्यामुळे जैन यांच्या विरोधात उभे राहणारे उमेदवार तुल्यबळ लढत देणं दूरच, ते त्यांचे डिपॉझीटही वाचवू शकत नव्हते. जैन यांचे ग्रह फिरले. त्यांच्यावर गैरव्यवहार, भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना घरकुल घोटाळ्यात तुरुंगात जावे लागले. 2014 ची निवडणूक त्यांनी तुरुंगातून लढवली, पण लोकांनी त्यांना स्विकारले नाही. त्यामुळे सुरेश दामू भोळे ऊर्फ राजू मामा भोळे यांचा आमदार म्हणुन उदय झाला. राजू मामा भोळेंचा नम्र स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन चालल्यामुळे 2019 च्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. गेल्या दहा वर्षात रस्ते, पूल, पाणी आदी सुविधा केल्याचा ते दावा करत आहेत. मात्र, त्यांच्या काळात जळगाव शहराचा विकास झाला नाही. शहर धुळीने माखले, महामार्ग मृत्यू मार्ग बनला आणि शहर अधोगतीच्या मार्गाला लागले, अशी खरमरीत टीका विरोधक करत आहे. विरोधकांच्या टीका आणि राज्याच्या राजकारणात बदललेली समीकरणे या कारणाने 2024 ची निवडणूक आव्हानात्मक असणार आहे. राजू मामा भोळे यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात कोण? हा प्रश्न होता. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली. अपेक्षेप्रमाणे गेल्या काही महिन्यापासून तयारीत असलेल्या जयश्री महाजन यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली. जयश्री महाजन ह्या अडीच वर्ष महापौर होत्या. या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून शहर विकासाची कामे केल्याचा दावा केला आहे. त्यांचा प्रचाराचा तोच मुद्दा आहे. त्यामुळे त्यांना आपल्या विजयाची खात्री आहे. उद्धव सेनेचं पक्ष संघटन, नगरसेवकांचा पाठबळ, राजू मामांच्या नाराजांची साथ या बळावर त्या विद्यमान आमदारांना चांगली लढत देऊ शकतात. जयश्री महाजन ह्या पाहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. प्रचाराला आणखी बरेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे निवडणुकीत आरोप – प्रत्यारोपांचे रंग भरले जाऊ शकतात.
भावा विरुद्ध बहिण
जळगाव शहराप्रमाणे पाचोरा विधानसभा मतदारसंघातील लढतही अशीच रंगतदार होणार आहे. ठाकरे गटात फुट पडल्यानंतर शिंदे सेनेत गेलेल्या आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच घरातील महिला उमेदवार देऊन आव्हान उभे केले आहे. पाचोरा मतदारसंघात किशोर पाटील यांची उमेदवारी शिंदे सेनेने कायम ठेवली आहे. तर ठाकरे यांनी त्यांच्या विरोधात त्यांची चुलत बहीण आणि स्व. आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली आहे. सुर्यवंशी ह्या देखील पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्या गेल्या काही दिवसापासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. किशोर अप्पा पाटील हे आपल्या आक्रमक स्वभावाने ओळखले जातात, त्या तुलनेत वैशाली सूर्यवंशी ह्या नम्र आहेत. सूर्यवंशी यांना राजकिय अनुभव नसला तरी वडीलांचा वारसा आहे. त्यामुळे त्या आपल्या भावाला तुल्यबळ लढत देतील, असे आज तरी चित्रं आहे.
खडसे कन्येला खूणावतेय विधानसभा
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा एकनाथ खडसे आणि भाजपचा बालेकिल्ला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांचे तिकीट कापून भाजपाने त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना अखेरच्या दिवशी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे खडसे परिवाराला निवडणूक प्रचारात वेळ कमी मिळाला. त्याचबरोबर पक्षांतर्गत विरोध आणि गुप्त कारवायांमुळे निवडणूक जड गेले. रोहिणी खडसे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील होते. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुरस्कृत केले होते. तसेच जिल्ह्यातील खडसे विरोधक भाजप नेत्यांनी रसद पुरवली होती. त्यामुळे 2019 ची निवडणूक चुरशीची होऊन रोहिणी खडसे यांचा अवघ्या बाराशे मतांनी पराभव झाला होता. या मतदारसंघात अनेक वर्ष एकनाथ खडसे यांच्याशी संघर्ष करत चंद्रकांत पाटील हे प्रथमच आमदार झाले. या वेळेस पुन्हा याच दोघांमध्ये लढत होणार आहे. गेल्या चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादी पुरस्कृत होते, या वेळेस ते शिंदे सेनेकडून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर रोहिणी खडसे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत. आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा दावा करत आहेत. तर रोहिणी खडसे ह्या एकनाथ खडसे यांनी केलेली कामे आणि पुढील पाच वर्षात मतदारसंघाला नवीन ओळख प्राप्त करून देण्याचा दावा करत आहेत. गेल्या काही वर्षापासून रोहिणी खडसे यांनी नाभाऊंची कन्या म्हणुन नाही तर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा प्रश्न त्यांनी लावून धरली धरला. पक्षाची प्रदेश पातळीवरील जबाबदारी सांभाळत राज्यात दौरे करून स्वतःची एक छाप पाडली आहे. आता त्यांना विधानसभा खुणावत आहे. वडील नाथा भाऊंची विधानसभेतील कमी त्या या निवडणुकीनंतर भरून काढतील का? याची लोकांमध्ये उत्सुकता आहे.
अमोल पाटील इतिहास घडवतील?
जिल्ह्यातील महिलांनी आव्हान दिलेल्या या तिघा मतदारसंघा व्यतिरिक्त रावेर आणि पारोळा एरंडोल मतदारसंघातील लढती देखील महत्त्वाच्या आणि लक्षवेधी आहेत. पारोळा – एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील हे शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटात दाखल झाले. त्यांना शिंदे सेनेची उमेदवारी मिळाली, पण त्यांनी यावेळेस प्रकृती अस्वस्थामुळे स्वतः ऐवजी मुलगा अमोल यांना निवडणूकीच्या आखाड्यात उतरवले आहे. अमोल पाटील हे जळगाव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत. युवा नेतृत्व म्हणुन काम करीत आहे. वडील आमदार राहिल्यामुळे जनसंपर्क चांगला आहे. मात्र, त्यांची लढत सोपी नाही. महाविकास आघाडीचे नेते, माजी मंत्री आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी ज्यांना मिळणार आहे, त्या सतिश पाटील यांच्याशी असणार आहे. सतीश पाटील यांच्याकडे राजकिय परिपक्वता, अनुभव, संघटन आहे. याशिवाय, जी गेल्यावेळेस नव्हती ती पुतण्या, माजी नगराध्यक्ष करण पवार यांची साथ असणार आहे. त्यामुळे लढत तुल्यबळ होईल. या मतदारसंघात काही अपक्ष पुन्हा एकदा भाग्य अजमावण्यासाठी किवा कुणाला तरी पाडण्यासाठी उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवणार अमोल पाटील वडीलांचा वारसा चालवण्यासाठी विधानसभेचा दरवाजा ठोठातील का, हे पहाणे महत्त्वाचे आहे.
दोन आमदार पुत्रं आमने-सामने
रावेर विधानसभा मतदारसंघ हा तसा कॉंग्रेसचा बालेकिल्ला. मोदी लाटेतही या मतदारसंघातील लोकांनी काँग्रेसची साथ सोडली नाही. विधानसभेचे सभापती राहिलेल्या मधुकरराव चौधरी यांच्यानंतर त्यांचे पुत्रं शिरीषदादा चौधरी हे या मतदारसंघातून सलग निवडून आले आहेत. त्यांनी या वेळेस स्वतः निवडणूक न लढवता मुलगा धनंजय यांना उमेदवारी दिली आहे. धनंजय हे युवा आहेत. शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीत काम करीत आहे. राजकिय वारसा, शैक्षणिक क्षेत्राचं पाठबळ, पुरोगामी विचारांचा मतदार ही त्यांची ताकद आहे. त्यांच्या विरोधात भाजपने माजी आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्रं अमोल जावळे यांना उमेदवारी दिली आहे. वडिलांचा राजकिय वारसा, पक्षाचं, कार्यकर्त्यांचं पाठबळ या जोरावर त्यांना मतदारसंघात परिवर्तनाची खात्री वाटत आहे. याशिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीत 30 हजार पेक्षा जास्त मतदान घेत आव्हान देणारे उमेदवार अनिल चौधरी यांनी देखील प्रहार जनशक्ती या बच्चू कडू यांच्या पक्षातर्फे उमेदवारी करीत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तुल्यबळ लढत पहायला मिळणार आहे.