जळगाव ः नवापूर चेक पोस्टवर बदली करण्यासाठी आपल्याच विभागाच्या निरीक्षकाकडून तीन लाखांची लाच खाजगी पंटराच्या माध्यमातून स्वीकारल्यानंतर जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकार्यासह एका खासगी पंटर इसमास छत्रपती संभाजी नगरच्या एसीबी पथकाने अटक केल्याने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
आरटीओ कर्मचारी असलेल्या तक्रारदार निरीक्षकाची नवापूर चेक पोस्टवर बदली करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना भावे नावाच्या खासगी पंटरच्या माध्यमातून तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार अधिकार्याने छत्रपती संभाजीनगर विभागीय लाचलुचपत विभागाला कळविले होते. लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्याप्रमाणे तक्रारदार यांनी खाजगी इसम भावे यांच्याकडे ही रक्कम देत असताना रंगेहाथ पकडण्यात आले तर प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे.
मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता
प्रादेशिक अधिकारी दिपक पाटील यांच्या कोल्हापूर, ठाणे, सांगली ,नगर येथील घरांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकार्यांनी दिलेली आहे. यात अनेक बेनामी संपत्तीसह मोठे घबाड सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.