नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं आज 26 डिसेंबर रोजी निधन झालं आहे. प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी सायंकाळी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मनमोहन सिंग 92 वर्षांचे होते. 22 मे 2004 रोजी मनमोहन सिंग हे देशाचे 13 वे पंतप्रधान बनले होते. त्यानंतर ते सलग दहा वर्षं देशाचे पंतप्रधान राहिले.
केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, देशाचे अर्थमंत्री आणि शेवटी पंतप्रधान. डॉ सिंग यांचा देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वातील प्रवास हा थक्क करणारा आहे.
यांच्या निधनाने संपूर्ण भारत शोकाकुल आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले मनमोहन सिंग एक नामांकित अर्थतज्ज्ञ म्हणून उदयास आले. देशाच्या अर्थमंत्रीपदासह त्यांनी विविध सरकारी पदांवर काम केले. देशाच्या आर्थिक धोरणांवर त्यांची अमीट छाप होती. संसदेत त्यांनी केलेली भाषणं अभ्यासपूर्ण होती. नागरिकांचे आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मनमोहन सिंग यांनी त्यांची अत्युच्च बुद्धिमत्ता आणि सचोटीच्या बळावर देशाचं नेतृत्व केलं. त्यांचा नम्रपणा आणि अर्थशास्त्राच्या सखोल अभ्यासाने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली.
श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबियांना
माझ्या मनःपूर्वक संवेदना : राहुल गांधी
मी एक मार्गदर्शक गमावला आहे. त्यांचे कोट्यवधी हितचिंतक मोठ्या अभिमानाने त्यांना स्मरणात ठेवतील.”, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डॉ. सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भारताने अतुलनीय उंचीचा
अर्थशास्त्रज्ञ गमावला- मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अत्यंत भावनिक शब्दांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतिंना उजाळा दिला आहे. ते लिहितात”इतिहास तुमच्याकडे अधिक करुणेने पाहील यात शंका नाही, डॉ. मनमोहन सिंग जी! माजी पंतप्रधानांच्या निधनाने भारताने एक दूरदर्शी राजकारणी, निर्विवाद सचोटीचा नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थशास्त्रज्ञ गमावला आहे. त्यांच्या आर्थिक उदारीकरण आणि हक्कांवर आधारित कल्याणकारी धोरणाने कोट्यवधी भारतीयांचे जीवन आमूलाग्र बदलले, भारतात एक मोठा मध्यमवर्ग निर्माण केला आणि कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. भारताची स्वप्ने घडवणारे एक अतिशय नम्र व्यक्तिमत्व, जे माझे आयुष्यभराचे ज्येष्ठ सहकारी होते. अत्युच्च समर्पणाच्या जोरावर त्यांनी वेगवेगळी पदे मिळवली. अशा मार्गदर्शकाच्या निधनावर मी शोक व्यक्त करतो. त्यांच्या मंत्रिमंडळात मी कामगार मंत्री, रेल्वे मंत्री आणि समाज कल्याण मंत्री म्हणून काम केल्याचा मला अभिमान आहे. शब्दांपेक्षा कृतीवर भर देणारा माणूस आणि देशाच्या उभारणीत असणाऱ्या त्यांच्या मोठ्या योगदानामुळे त्यांचं नाव इतिहासात कायमचं कोरलं जाईल.
या दुःखाच्या क्षणी, मी त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि असंख्य चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांना या मोठ्या संकटातून सावरण्याची शक्ती मिळो. भारताच्या विकास, कल्याण आणि समावेशकतेच्या धोरणांना चालना देण्याचा त्यांचा चिरस्थायी वारसा कायम जतन केला जाईल. त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभो. काँग्रेसच्या नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी लिहितात, “राजकारणात सरदार मनमोहन सिंग जी यांनी जितका आदर कमावला तितका आदर फार कमी लोकांना मिळतो.
त्यांचा प्रामाणिकपणा आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. विरोधकांनी केलेला अन्याय आणि गंभीर वैयक्तिक टीकेला तोंड देऊन देशाची सेवा करण्यासाठी वचनबद्ध राहिलेल्या आणि या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते गणले जातील. मनमोहन सिंग शेवटच्या श्वासापर्यंत समतावादी, ज्ञानी, दृढनिश्चयी आणि धाडसी राहिले. राजकारणाच्या खडतर जगात एक प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस म्हणून ते जगले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं, ” माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळं तीव्र दुःख झालं. भारताच्या आर्थिक प्रवासाची दिशा ठरवण्यात त्यांचं मोलाचं योगदान होतं. देशाच्या प्रगतीचा मुख्य आधारस्तंभ म्हणून त्यांची भूमिका राहील.
अत्यंत नम्र आणि शांत स्वभावाच्या या नेत्यानं कायम देशहिताला प्राधान्य दिलं. मी भाजप अध्यक्ष असताना अनेकदा त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. प्रत्येकवेळी माझ्यावर त्यांचा प्रचंड प्रभाव पडला.
भारतानं आज एक थोर सुपुत्र गमावला आहे. डॉ.सिंग यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहितात, “देशाचे माजी प्रधानमंत्री आणि आर्थिक सुधारणांचे जनक व जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी अतिशय कठिण काळात भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक पातळीवर सन्मान प्राप्त करुन दिला.देशाचे नेतृत्व करताना त्यांनी आपली अद्वितीय बुद्धिमत्ता आणि नम्रतेचे दर्शन घडविले. भारताच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय असेच आहे.त्यांच्या निधनामुळे एका पर्वाचा अस्त झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव लिहितात, “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एक सत्यवादी आणि सभ्य व्यक्तिमत्व असलेले महान अर्थतज्ञ होते. त्यांचं निधन ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कधीही भरून न येणारी हानी आहे.”
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला: देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जी यांच्या निधनाने आपण एक महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी गमावले आहेत.
भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांनी दिलेले योगदान, पंतप्रधान म्हणून 10 वर्षे देशाची सेवा करणे, हे कायम स्मरणात राहील. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे कुटुंबिय, मित्र आणि हितचिंतकांना हे दुःख पचवण्याचे धैर्य मिळो.