मुंबई : महाविकास आघाडीने शनिवारी, 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात बंदची घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसने या बंदमध्ये सहभागी होण्याचे जनतेला आवाहन केले आहे. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अनेक सेवांवर त्यांचा परिणाम दिसून येईल. चाकरमान्यांना या बंदचा फटका बसू शकतो.
जागा वाटपाची चर्चा रद्द
महाविकास आघाडीची नुकतीच बैठक झाली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत चर्चा होणार होती. पण राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा मुद्दा मांडत जागा वाटपाची चर्चा रद्द करण्यात आली आणि शनिवारी 24 ऑगस्ट रोजी राज्यात बंदची हाक देण्यात आली. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर कामकाजावर परिणाम दिसू शकतो.
प्रत्येकाला बंद पाळण्याचे आवाहन
‘मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, ज्यांना ज्यांना संवेदनशील मन आहे; त्या प्रत्येकाने हा बंद पाळला पाहिजे. नराधमांना धडा शिकवला पाहिजे.’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. हा राजकीय पक्षांचा बंद नाही. आपल्या माता-भगिनींसाठी आपण किती जागृत आहोत हे दाखवणारा बंद आहे. विकृतांच्या मनात दहशत बसवण्यासाठी हा बंद आहे. कुणीही असं दुष्कृत्य करण्यास धजावू नये आणि असं काही झालंच तर त्याला ताबडतोब शिक्षा व्हावा यासाठी हा बंद असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक दळणवळणावर परिणाम
राज्यातील एसटी महामंडळ आणि रेल्वे सेवेवर या बंदचा परिणाम दिसू शकतो. मुंबईत लोकल सेवेवर परिणाम दिसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी बंद दरम्यान एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक झाल्याने नुकसान झाले होते. तर बदलापूरकरांनी आंदोलन करत रेल्वे रोको केला होता. खबरदारी म्हणून या सेवांना राज्यात काही ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे. बंदच्या माध्यमातून विरोधक ताकद दाखवण्याची शक्यता आहे.
बाजारपेठ राहतील बंद
हा राजकीय बंद नसल्याचे अगोदरच महाविकास आघाडीने स्पष्ट केले आहे. उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. भाजीपाला मार्केट, इतर दुकाने बंद असतील. दूध विक्री, भाजीपाला विक्री आणि किराणा सामानाची दुकानं, हॉटेल्स बंद राहण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक
दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री दोन तास बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.