नेपाळमध्ये बस दरीत कोसळली, जळगाव जिल्ह्यातील 26 भाविकांचा मृत्यू

0
83

उत्तर प्रदेशातील बस

जळगाव: नेपाळमध्ये तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भुसावळ तालुक्यातील प्रवाशांच्या बसला उत्तर काठमांडूकडे (नेपाळ) जात असताना शुक्रवारी भीषण अपघात झाला. उत्तर प्रदेशातील ही खासगी बस लगतच्या मर्स्यांगडी नदीमध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत २६ जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. तर काही गंभीर जखमी झाले आहेत. उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमधून हे भाविक काठमांडूला चालले होते. पोखरा येथे काही काळ थांबा घेतल्यानंतर ती बस काठमांडूच्या दिशेने निघाली.

तनहुन जिल्ह्यात एना पहारा महामार्गावर बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती महामार्गावरून थेट डोंगररांगांमध्ये असलेल्या नदीमध्ये जाऊन कोसळली. या बसमध्ये चालक आणि सहाय्यक चालकासह ४३ प्रवासी होते. मृत्युमुखी पडलेले सर्व भाविक भुसावळ तालुक्यातील वरणगाव- तळवेल परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. जखमींपैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेपाळमधील तनहुन जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२२) सकाळी साडे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नेपाळची राजधानी काठमांडूपासून १२० किलोमीटरवर पश्‍चिमेकडे अबुखैरेनी गावाजवळ हा अपघात घडला. नेपाळमधील जवानांचे मदत पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना काही भाविकांना वाचविण्यात यश आले असून अन्य बेपत्ता भाविकांचा शोध घेतला जात आहे.

बस अपघातातील 26जणांचे मृतदेह उद्या (शनिवारी) महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. हे 26 मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विमानाने आणले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाचा कार्यभार असल्याने त्यांनी घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीतील इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या प्रकरणात मृतदेह परत आणण्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बसची नोंदणी यूपी मधील ज्या बसला हा अपघात घडला ती गोरखपूरच्या केसरवाणी ‘टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी’ची (क्र. यूपी ५३ एफ.टी ७६२३) होती. गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागात राहणाऱ्या सौरभ केसरवानी यांची पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर तिची नोंदणी आहे. महाराष्ट्रातील काही भाविकांनी जवळपास चार महिन्यांपूर्वी नेपाळला जाण्यासाठी ‘केसरवाणी ट्रॅव्हल्स’च्या तीन बस बुक केल्या होत्या.

एकूण तीन बस

सुमारे ११० लोकांना घेऊन तीन बस प्रवास करीत होत्या. यापैकी जळगाव जिल्ह्यातील ४० ते ५० भाविक दोन बसमधून प्रवास करीत होते. तिसरी बस नेपाळमधील स्थानिक भक्तांची असल्याचे सांगितले जाते. या अपघातात बसचा चालक आणि वाहक यांचाही मृत्यू झाला. दुसऱ्या बसमध्ये प्रवास करणारे लोक नेपाळमधील मुंगलिंगमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पाण्याचा प्रवाह प्रचंडने

पाळच्या डोंगराळ भागातील नद्या या प्रचंड वेगाने वाहतात. मागील काही दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस कोसळत असून नदीतील पाण्याचा रंग देखील काहीसा मातकट झाला असल्याने प्रवाशांचा शोध घेणे हे बचाव पथकासाठी आणखीनच आव्हानात्मक बनले आहे. साधारणपणे नेपाळमध्ये जून ते सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो त्यामुळे याभागात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होते. मागील महिन्यामध्ये प्रवाशांच्या दोन बसला भूस्खलनामुळे अशाच पद्धतीने भीषण अपघात झाला होता.

मृतांमध्ये यांचा समावेश 

अनंत ओंकार इंगळे, सीमा अनंत इंगळे, सुहास राणे, सरला राणे, चंदणा सुहास राणे, सुनील जगन्नाथ धांडे, नीलिमा सुनील धांडे, तुळशीराम बुधा तायडे, सरला तुळशीराम तायडे, आशा समाधान बावस्कर, रेखा प्रकाश सुरवाडे, प्रकाश नथू सुरवाडे, मंगला विलास राणे, सुधाकर बळीराम जावळे, रोहिणी सुधाकर जावळे यांचा मृतांमध्ये समावेश आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here